पुणे : भरधाव वेगातील बाइकचे नियंत्रण सुटल्याने बाईक विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री दोनच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे गावाजवळ झाला. अपघातातील तरुण मूळ जळगावचे आहेत. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, उत्तमनगर पोलिसांनी मृत तरुणावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यशोधन अविनाश देशमुख (२३) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, हर्षल दीपक पाटील (२४) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे तरुण जळगावचे असून पुण्यातील बावधन येथील पेंबल्स अर्बनीया सोसायटीमध्ये राहत होते. याबाबत पोलिस हवालदार सचिन प्रभाकर गायकवाड यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यशोधन आणि हर्षल हे खडकवासला परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी यशोधन भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. कुडजे गावातून मुख्य रस्त्याने पुढे आगळंबे फाट्याकडे जाताना साहिल हॉटेलजवळ यशोधनचा बाईकवरील ताबा सुटला आणि बाईक विजेच्या लोखंडी खांबाला जाऊन जोरात धडकली.
या अपघातात यशोधनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल गंभीर जखमी झाला. या अपघातात बाईकचे नुकसान झाले. तसेच विजेचा खांब वाकला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.