पुणे : दारुचे सेवन करुन भरधाव वेगात चारचाकी चालविणा-या चालकाने पाच ते सहा वाहनांना दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना न.चिं केळकर रस्त्यावरील झेड ब्रिजजवळ शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८) व नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय ४४) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या अपघातात रिअल इस्टेट व्यावसायिक विश्वनाथ रामचंद्र राजोपाध्ये (वय 60, 563 जलधारा सोसायटी, नारायण पेठ) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रसिद्ध वकील प्रतीक राजोपाध्ये यांचे ते वडील आहेत. याप्रकरणी रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश आणि त्याचा मित्र नटराज हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते. नदी पात्रापासून टिळक चौकाच्या दिशेने बेफाम वेगात चारचाकी घेऊन जात असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला. चारचाकीने रिक्षाच्या पुढे असलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार विश्वनाथ राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकींना धडक दिली. पॅसेंजर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. शेवटी एका वीजेच्या खांबाला जाऊन तो धडकला. यामध्ये दोन ते तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर केळकर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. प्रक्षुब्ध जमावाने कारवर हल्ला करून कारचालकाला मारहाण केली. साथीदाराने पळ काढला. विश्रामबाग पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर एका तासातच पोलिसांनी साथीदारालाही अटक केली. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे. घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.