लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उसावर पडणारा हुमनी रोग घालवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाइट ट्रॅपचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ऊसतोड झाल्यावर राहिलेल्या खोडाला फुटवा फुटतो. याचवेळी खोडाच्या मुळांना भुंगे लागतात. ते मूळ खातात व ते रोप मरते. ही कीड मोठ्या प्रमाणात लागते व उत्पादनात मोठी घट येते.
यावर कृषी खात्याने उपाय सुचवला आहे. या भुंग्यांचा शेताच्या कडेला असणाऱ्या झाडांवर अधिवास असतो. तिथेच त्यांचे प्रजनन होते व अळ्या तयार होऊन त्या शेतात शिरतात, उसाच्या खोडाला धरून मुळापर्यंत जातात. अशा झाडांच्या बरोबर समोर एक खड्डा घेऊन त्यात रॉकेलमिश्रित पाणी टाकायचे. खड्ड्या लाईट लावून ठेवायचा. त्याच्या आकर्षणाने भुंगे उडून येतात व खड्ड्यात पडतात. यातून त्यांची साखळी तुटते असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ऊसशेतीत हा प्रयोग नक्की करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.