पुणे - पुणे विमानतळावर पहाटे एकाचवेळी दोन प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे. असे असताना प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील (58) नावाचे प्रवासी पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाने बंगळुरूला जात होते. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली जात असताना त्यांच्या बॅगेत 22 काडतुसे आढळून आली. हा प्रकार पहाटे पावणेपाच वाजता लक्षात आला. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी पाटील यांना थांबवून ठेवून सामानासह विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असून नजर चुकीने सामानात हे 22 काडतुसे आल्याचे त्यांची सांगितले. त्यांच्या सामानात केवळ काडतुसे असून रिव्हॉल्व्हर नव्हते.