पुणे : राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याचे (एनआरसी) दुरूस्ती विधेयक मंजुर होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकात्वाला धर्माचे विशेषण जोडले जाईल. संविधानासह कुठेही धर्माचा संदर्भ देऊन नागरिकत्वाचा विचार केलेला नाही. त्यामुळे ‘एनआरसी’ देशभरात लागु झाल्यास राज्यघटनेचा आत्मा रक्तबंबाळ होईल, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली. राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरूजी स्मारक येथे रविवारी आयोजित ‘एनआरसी विरोधी परिषदेत’ ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावा, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, युवक क्रांती दलाचे डॉ. कुमार सप्तर्षी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो, शेतकरी नेते रंगा राचूरे, रजिया पटेल, धनाजी गुरव उपस्थित होते. ‘एनआरसी’ला विरोध करत सर्वच वक्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारच्या भुमिकेवर टीका केली. ते म्हणाले, घुसखोरांना शोधून काढण्यासाठी ‘एनआरसी’चा वापर करण्याचे हे मुर्खपणाचे काम जगातील कोणत्याही सरकारने केलेले नाही. पण भारत सरकारकडून विशिष्ट हेतूने घुसखोरीची भीती दाखवून ही दुरूस्ती करत आहेत. हिटलरने ज्युंवर केलेल्या अत्याचाराप्रमाणेच भारतातील मुस्लिम, आदीवासी, दलितांची स्थिती होईल. त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा हा प्रयत्न आहे. विविध रूपाने सरकारकडे नागरिकांची सर्व माहिती उपलब्ध असताना एनआरसी कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा फॅसिझम खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी ‘पिपल रजिस्टर आॅफ पिपल्स’ हे लोकांनीच तयार करायला हवे. त्याची सुरूवात कर्नाटकमध्ये होत आहे. हिंदुत्व हा सत्तावाद असून बंधुत्व नाही, असे स्पष्ट करून सप्तर्षी म्हणाले, ‘सध्याचे केंद्र सरकार पाशवी बहुमत असलेले आहे. राष्ट्राची मोडतोड, स्वातंत्र्याच्या मूल्यांची मोडतोड करून हिंदू राष्ट्राचे मूल्य आणणारे सरकार आहे. यापासून सावध राहायला हवे. ‘एनआरसी’वर बहिष्कार घालायला हवा.’ परिषदेत सहभागी इतर वक्त्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. ‘एनआरसी’विरोधात सर्व घटकातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आणि एनआरसीला विरोध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
...........
मुस्लिम, ख्रिश्चन, साम्यवादी यांना आरएसएस शत्रु मानतो. गोळवलकर यांनी आपल्या पुस्तकात असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्या अजेंड्यावर मुस्लिम आहेत. हिंदु-मुस्लिम भावना पेटवून निवडणुक जिंकता येते, हे त्यांना पाहिले आहे. त्यांना स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रवादी नव्हे तर धार्मिक राष्ट्रवाद हवा आहे. इंग्रजानी किमान काही नीतीमुल्य सांभाळली होती. पण सध्या तशी स्थिती नाही.- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते