वासुदेव, कडकलक्ष्मी, भांड, बाळ-संतोष या सर्व लोकभूमिका काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहेत. लोककलावंतांनी कीर्तन, लोकनाट्य, गोंधळ, जागरण, शाहिरीतून महाराष्ट्राला जागते ठेवले आहे. या कलांचे शरीर जरी मनोरंजन असले, तरी आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलांचे संशोधन करीत संत आणि लोककलावंत, संतसाहित्य आणि लोककला असा सांस्कृतिक अनुबंध संशोधन, चिंतनाच्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसाहित्याचा विचार केला, तर लोककलांबाबतचे साहित्य मौखिक स्वरूपात आहे. या साहित्यास संहिताबद्ध, शब्दरूप उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यात ललित साहित्याच्या चिंतनाला प्राधान्य देणार आहे, असे ज्येष्ठ भारुडकार, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगितले.जीवनानुभव सांगताना डॉ. देखणे म्हणाले, ‘‘ज्ञानरुप ब्रह्मतत्त्व प्रेमरुप करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, तर प्रेमरुप भक्तितत्त्वाचेही वास्तववादी रूप मांडण्यासाठी तुकोबांची गाथा आहे. विठ्ठलभक्ती, अध्यात्मदर्शन याबरोबरच सामाजिक जीवनाचे उत्कट चिंतन घडवून त्यांनी जीवनाच्या वास्तवाकडे नेले आणि विवेकप्रामाण्यवादाची मांडणी केली. खरे तर ज्ञानदर्शन, भावदर्शन आणि शब्ददर्शन यातून उभे राहिलेले जीवनवादी विवेकदर्शन म्हणजेच संतसाहित्य. अध्यात्म, केवळ भक्तितत्त्व सांगण्यासाठी संतसाहित्य नाही, तर पर्यावरण, विज्ञान, सामाजिक जाणिवा, सामाजिक तत्त्वांचे सद्विचारदर्शन, जगण्यातली स्वाभाविकता, प्रतिकूलतेवर मात करण्याची भूमिका, शुद्ध जीवनप्रणाली अशा विविध अंगांनी लौकिक व्यवहारनीती जागवून संतसाहित्याने प्रवृती-निवृत्तीचा समन्वय साधला आहे. पण त्या भूमिकेतून संतसाहित्याचे समीक्षण झाले नाही. केवळ अध्यात्मदर्शी, भक्तिदर्शी साहित्य म्हणून ते बाजूला पडले. पण त्या भूमिकेतून संतसाहित्याचे समीक्षण झाले नाही. भक्तीचे मूळ सामाजिक एकात्मतेमध्ये आहे. हे परोपरीने समजावून दिले आणि कीर्तन, भजन, भारुड, वारी यांच्या आविष्कारातून भक्तीचे सामाजिकीकरण केले. आजच्या सामाजिकस्तरावरील समतेचा विचार करताना सामाजिक तत्त्वचिंतनाचा आद्य प्रवाह संतांच्याच आध्यात्मिक तत्त्वचिंतनातून उद्यास आला आहे. हे लक्षात येते. ऐहिक दु:खांचा व दैन्याचा विसर पाडून मनुष्याला कोणत्याही काल्पनिक वातावरणात गुंतवून संतांनी त्यांना भोळ्या भावनेत गुरफटून ठेवले नाही. भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाणघेवाण झाली. सदाचाराचा व्यापार फुलला. विवेकतत्त्वाची उधळण झाली आणि पंढरीच्या वाळवंटात खऱ्या अर्थाने ‘एकचि टाळी झाली’ या वाळवंटात खऱ्या अर्थाने उपेक्षितांचे मुकेपण संपले आणि चोखोबांसारखा संत आत्मविश्वासपूर्वक सांगू लागला. ज्ञानदेव म्हणजे सारस्वताचा शब्दसूर्य, तर तुकोबाराय म्हणजे अमृततत्त्वाचा वर्षाव करणारा पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्र होय. या संत साहित्याचा आस्वाद कसा घ्यावा, त्यासाठी ज्ञानदेवांनीच एक सुंदर दृष्टांत दिला आहे.‘‘जैसे शारदेचिये चंद्रकळे, माजी अमृतकण कोवळे, ते वेचिती मनेमवाळे, चकोरतलगे’’ शरदऋतुच्या चांदण्यातील चंद्रकिरणांचे अमृत कण जशी चकोर पक्ष्याची पिले हळुवारपणे वेचतात आणि तृप्त होतात त्याच हळुवारपणे संतसाहित्याचा आस्वाद घ्यावा आणि तृप्त व्हावे. महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली. लोकपरंपरा लाभली तशीच सुधारकांचीही परंपरा लाभली. संतांनी महाराष्ट्राला विवेकप्रामाण्यवाद दिला आणि त्या विवेकप्रामाण्यवादावर पुढे सुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवाद उभा राहिला. महाराष्ट्रात पत्रपंडित बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे पुढे नेत होती. महाराष्ट्राच्या लोकजीवनाला भक्तीच्या व्यासपीठावरूनही खरी सुधारण्याची आणि पुरोगामित्वाची शिकवण संतांनी दिली. म्हणून संतसाहित्याकडे माझी पाहण्याची भूमिका, विवेक प्रबोधनवादाचा आहे. तीन परंपरा महाराष्ट्रात आहेत. संत, लोकपरंपरा आणि सुधारकांचा महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या लोकभूमिका, पारंपरिक लोककला यातून एक लोकसंस्कृती उभी राहिली. त्या लोकभूमिका म्हणजे अंगणातील विद्यापीठ.’’ देखणे म्हणाले, ‘‘साहित्य आणि लोककला यांचे अद्वैत नाते आहे. संतसाहित्याचे समीक्षण करताना केवळ निवृत्तिवादी विचार मांडले गेले, पण संतसाहित्यामध्ये नगररचना, पर्यावरण, लोकजीवन, लोकांचा सामाजिक विवेक अशा प्रवृत्तीवादाच्या असंख्य वाटाही आहेत. प्रवृत्तीवाद आणि विवेक तत्त्वाच्या अंगाने संतसाहित्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’
लोककलांचा आत्मा प्रबोधनाचा
By admin | Published: May 11, 2017 4:04 AM