मंचर : आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामदैवतांच्या यात्रा पार पडत आहेत. बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने बैलगाडा शर्यतीविना यात्रा पार पडत असल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर आहे. यात्रेच्या दिवशी शर्यतीच्या घाटात पोलिसांचा फौजफाटा तैनात राहत आहे. यात्रा असूनही गावांमध्ये शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे.मार्च व एप्रिल या २ महिन्यांत ग्रामीण भागातील गावोगावच्या यात्रा पार पडतात. यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. पूर्वी यांत्रामध्ये सर्वत्र महत्त्वाची बैलगाडा शर्यत असायची. मात्र, मागील तीन वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने यात्रांमधील उत्साह कमी झाला आहे. आता मुंबईकर, पुणेकर तसेच पाहुणेमंडळी यात्रेसाठी गावाला येण्याचे टाळू लागली आहेत. यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजऱ्या होतात. अखंड हरिनाम सप्ताह, देवजन्माचे कीर्तन, महाप्रसाद एवढेच निवडक कार्यक्रम होतात. एखादा करमणुकीचा कार्यक्रम होऊन यात्रा संपते. बैलगाडा शर्यती नसल्याने यात्रेच्या दिवशी फारशी गर्दी होत नाही.राज्य शासनाने बैलागाडा शर्यती सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले टाकली आहेत. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र पोलीस प्रशासन सध्या बैलगाडा शर्यतीबाबत असलेल्या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. यात्रेच्या दिवशी शर्यतीच्या घाटात पोलिसांची गाडी उभी केली जाते. पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. पोलीस त्यांचे काम करीत असले, तरी बैलगाडा मालक व शौकीन नाराज झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील साकोरे, लांडेवाडी या दोन महत्त्वाच्या गावांच्या यात्रा बैलगाडा शर्यतीविना पार पडल्या. नजीकच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये यात्रा असून ग्रामदैवतांच्या यात्रा बैलगाडा शर्यतीविना पार पडण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)शर्यतीवरील बंदीसंदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदी उठल्यानंतर पुन्हा भिर्रर्रर्र होऊन ग्रामीण भागातील घाट गजबजणार आहेत. तोपर्यंत तरी बैलगाडा शर्यतीविना ग्रामदैवतांच्या यात्रा पार पडत आहेत.
यात्रा असूनही गावांमध्ये शुकशुकाट
By admin | Published: April 01, 2017 12:00 AM