- राहुल गायकवाड पुणे : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळवावा यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई असाे की दुभाजकावर करण्यात आलेली रंगरंगाेटी. सार्वजनिक भिंतींवर पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंची चित्रे सुद्धा रेखाटण्यात आली. अशी सगळी पाऊले महापालिककेडून उचलली जात असताना काही समाजकंटक यावर बाेळा फिरवत आहेत. काही मिनिटापूर्वी रंगवलेले दुभाजक पुन्हा पानपिचकाऱ्यांनी लाल रंगाने रंगविण्याची ''किमया'' या समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहर जरी स्वच्छ हाेत असलं तरी ''अस्वच्छ'' मने ''स्वच्छ'' हाेणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा क्रमांक बराच मागे गेल्याने यंदा विशेष माेहिम पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात आली. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर तसेच थुंकणाऱ्यांवर दंडरुपी कारवाई करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छ करुन घेतले. त्याचबराेबर दुभाजक, सार्वजनिक भिंती यांच्यावर रंगरंगाेटी करण्यात आली. शहरातील अनेक भिंतींवर पुण्याचे चित्ररुपी दर्शन रेखाटण्यात आले हाेते. तर दुसरीकडे दुभाजक पुन्हा एकदा रंगविण्यात आले. परंतु काही समाजकंटकांनी या चित्रांवर, तसेच दुभाजकांवर थुंकून ते लाल करुन टाकले. त्यामुळे रंगकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच महापालिकेची मेहनत वाया गेल्याचे चित्र आहे.
चित्ररुपी पुणे सार्वजनिक भिंतींवर रेखाटणारे दीपक चांदणे म्हणाले, आम्ही चित्र रेखाटल्यानंतर तसेच दुभाजक रंगविल्यानंतर काही क्षणातच नागरिकांकडून त्यावर थुंकले जाते. अनेकदा तर लाेक आम्ही काम करत असताना आमच्या अंगावर देखील थुंकले आहेत. या सर्व प्रकारामुळे मनाला वेदना हाेतात. आपली कलाकृती काही मिनिटात खराब हाेताना पाहताना अतिव दुःख हाेते. नागरिकांनी भिंतींवर, दुभाजकांवर न थुंकल्यास शहर सुंदर राहण्यास मदत हाेणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात आले. अनेकदा नागरिक रंगविलेल्या भिंतींवर, दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात. ही अत्यंत चुकीची गाेष्ट आहे. शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. लाेकांना पालिकेकडून दंड केला जाताे परंतु लाेकांमध्ये जागृती हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराचे आराेग्य चांगले राखण्यासाठी तसेच शहराला सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.