पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढून पक्षाबाहेरील माणसे पक्षाबरोबर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच पुण्यात मात्र काँग्रेसमधील दोन गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दोन वेगवेगळ्या मागण्यांवरून ही गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
पोलिस आयुक्तपदी रितेशकुमार यांची निवड झाल्यानंतर लगेचच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जोशी यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले. त्यामध्ये कोरोना काळात सामान्य नागरिकांवर दाखल गुन्हे, राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे त्वरित मागे घ्या, अशी मागणी केली. त्यांच्यासमवेत माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, वीरेन्द्र किराड, रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर होते.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आता पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून संघटितपणे केलेले गुन्हे राजकीय म्हणून मागे घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे. तसे करताना त्यांनी त्याच पत्रात पक्षाच्याच प्रदेश उपाध्यक्षांनी केलेल्या मागणीवर आक्षेप घेतले आहे. काँग्रेसच्या काही गटांनी याआधी दिलेले पत्र पक्षाची अधिकृत भूमिका नाही. काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर शहराध्यक्षांच्या स्वाक्षरीने दिलेली भूमिकाच अधिकृत समजावी, असेही नमूद केले आहे.
शिंदे यांच्या मागणीला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने काँग्रेस भवनावर काढलेल्या मोर्चाचा तसेच आवारात घुसून वाहनांची नुकसान केल्याचा संदर्भ आहे. याबाबत पक्षाच्यावतीने पोलिसांकडे आधीच फिर्याद दिलेली आहे. काँग्रेसच्या ‘त्या’ गटाने केलेल्या मागणीला अनुसरून पोलिसांनी काँग्रेस भवनवरील हल्ल्याचा गुन्हा मागे घेतला, तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शिंदे गटाने दिला. अशा प्रकारच्या संघटितपणे केलेल्या गुन्हेगारी कृत्याला राजकीय गुन्हा म्हणण्याला आमचा आक्षेप आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.