पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे राजकीय बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, काही जाहीर कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. मात्र, काकांना न भेटताच अजित पवारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचं सोशल मीडियातून समोर आलं. तर, राखी पौर्णिमेच्या सणालाही अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट नसल्याने चर्चा रंगली होती. त्यामुळे, आता पवार कुटुंबाच्या दिवाळी सणाला अजित पवार एकत्र येणार का, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता, या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. अजित पवार दिवाळी सणासाठी बारामतीत दाखल झाले आहेत.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, ते गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटले. त्यामुळे, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित दादांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यातच, राजकीय भेटी आणि कौटुंबिक भेटी वेगेवगळ्या असतात, असं सुप्रिया सुळे सातत्याने सांगतात. या भेटीवरही त्यांनी तसेच भाष्य केले होते. त्यामुळे, अजित पवार दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबासमवेत एकत्र येतील का, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यातच, पाडव्याच्या एक दिवस अगोदरच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच आम्ही दिवाळी एकत्रित साजरी करू, असे स्पष्ट केले होते. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीत पवार कुटुंब खरेच एका मंचावर येतील का याबद्दल साशंकता व्यक्त होत होती, ती अजित पवारांच्या एकत्र येण्याने आता दूर झाली आहे.
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आहे. कान्हेरी येथील अनंत तारा बंगल्यावर भोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत. श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे भोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय दाखल झाले आहेत. दरम्यान, बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील धनी वस्तीला भेट दिली. त्यामुळे, कदाचित पाडव्यालाही पवार कुटुंब एकत्रित आल्याचे फोटो समोर येतील.
दरम्यान, बारामतीत शनिवारी आयोजित शारदोत्सवात सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, शरद पवार यावेळी उपस्थित नव्हते. पण, आज शरद पवारांसह पवार कुटुंब एकत्र आले आहे.