आपला मणका, पर्यायाने पाठीचा कणा शरीराचे वजन उचलत असतो. शरीराच्या प्रत्येक हालचालीसाठी मणक्याचा आणि पर्यायाने पाठीच्या कण्याचा सहभाग आवश्यक असतो. तो शरीरात मोठ्या प्रमाणात कार्य करत असल्याने मणक्यावर अधिक भार पडतो.
स्पाँडिलायटिस म्हणजे वयोमानाप्रमाणे होणारी मणक्यांच्या हाडांची झीज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या आजाराचे निदान एक्स-रे काढून केले जाते. मणका एकमेकांवर सरकणे, अपघातानंतर मणक्यांना इजा पोहोचणे, मणक्यांचा क्षयरोग व जंतूसंसर्ग, मणक्यांचा कॅन्सर, मणक्यांचा संधिवात अशा विविध आजारांकडे भीतीमुळे व गैरसमजुतीने दुर्लक्ष करू नका, वेळीच निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
स्पाईन सर्जन डॉ. शार्दुल सोमण म्हणाले, ‘बहुतांश रुग्ण स्पाँडिलाायटिसच्या त्रासावर स्वत:च औषधोपचार करु बघतात. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वेदनाशामक गोळ्यांमुळे मणक्यातील वेदना काही वेळासाठी कमी होईल. परंतु, औषधांचा प्रभाव कमी झाल्यानंतर दुखणे अधिक वाढू शकते. म्हणून मणक्याच्या वेदनेवर डॉक्टरांकडून उपचार घेणे गरजेचे आहे. मणक्याच्या त्रासावर केवळ औषध हा इलाज नसून जीवनशैलीत योग्य बदल करणे, पौष्टिक आहाराचे सेवन, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.’
-----------------------------
स्पाँडिलायटिसमुळे दोन मणक्यांच्या मधील गादीची झीज होते. वजन उचलल्यावर किंवा हिसका बसल्यानंतर ही गादी सरकून नसांवर दाब येतो. ज्याला स्लीप डिस्क असे म्हटले जाते. ७०% लोकांमध्ये स्लीप डिस्क शस्त्रक्रियेशिवाय ठीक होते. परंतु, ३०% रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते. शस्त्रक्रियेमध्ये अनेक आधुनिक पद्धतींचा अवलंब केला जातो. कमी टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याने रुग्णाला जास्त वेदना जाणवत नाहीत. या शस्त्रक्रियेला ‘लाईफस्टाईल मॉडिफायर’ असे म्हटले जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्वीप्रमाणे वेदनामुक्त आयुष्य जगू शकतो.
- डॉ. शार्दूल सोमण, स्पाईन सर्जन