राज्यात कोरोना आपत्तीमुळे निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता लोकमतचे संस्थापक स्वर्गवासी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दोन जुलैपासून राज्यभर रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञात सासवड येथील श्रीमंत नेताजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपले अमृतमहोत्सवी (७५) वे वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करून विविध सामाजिक ऊपक्रमाद्वारे साजरे करण्यावर भर दिला आहे.
रक्तदान शिबिराची सुरूवात मान्यवरांचे हस्ते श्रीगणेशाची आरती करून करण्यात आली. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात महिला, तरूण, मंडळाचे कार्यकर्ते, दिव्यांग रक्तदात्यांनी सहभाग नोेंदविला. यावेळी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने पाच दिव्यांगानी रक्तदान केले. कोरोना लसीकरण, हिमोग्लोबिनची कमतरता यामुळे महिलांची संख्या लक्षणीय असून देखील अनेकांना रक्तदान न करताच निराश होऊन परत जावे लागत होते. तरीही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हार न मानता रक्तदान शिबिरात अनेक तरुणांना रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य आहे रक्तदान हे निस्वार्थ भावनेने केले पाहिजे कारण आपल्या एका रक्तदानातून कोणालातरी जीवदान मिळणार असल्याचे सांगत ७७ जणांनी रक्तदान केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते प्रत्येक रक्तदात्याला लोकमत व रोटरी ब्लडबँकेचे प्रमाणपत्र तसेच श्री गणेशाची प्रतिमा मंडळाचे वतीने देण्यात आली.
——————————————————————
२०सासवड रक्तदान शिबीर
फोटोओळ— रक्तदान शिबिरात दिव्यांग बांधव रक्तदान करताना.