सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिसरातून सुमारे २६० युवक वर्गाने रक्तदान केले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते. या पोलीस ठाण्यांतर्गत सुपे, सोमेश्वरनगर, पणदरे, मोरगाव, वडगाव निंबाळकर या पाच ठिकाणी बुधवारी ( दि. २३ ) महा रक्तदान शिबिर घेण्यात आले. पडले. यामध्ये एकूण १,३१७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधून प्रथमच मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ, पत्रकार, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, नाभिक बांधव, सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील, होमगार्ड, महिला दक्षता समिती, नागरिकांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग नोंदवला.
यावेळी अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि हेल्मेट देण्यात आले. वडगाव निंबाळकर येथे (३६२) सोमेश्वर नगर दूरक्षेत्र (२८३) सुपा दूरक्षेत्र (२६०) पणदरे दूरक्षेत्र (२५८) मोरगाव पोलीस मदत केंद्र (१५४) अशा एकूण ५ ठिकाणी एकूण १३१७ रक्त पिशवी संकलन झाले.
वडगाव निंबाळकर येथे शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तहसीलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार चिंतामणी क्षीरसागर आभार सहायक फौजदार शरद वेताळ यांनी मानले.
बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती शहर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
................................................
फोटो २३ सुपे रक्तदान शिबिर
सुपे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी पाहणी करताना सपोनी सोमनाथ लांडे व इतर.