पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे राज्यभर ‘रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान मोहीम चालू केली आहे. यात शनिवारी शहरातील भवानी पेठ, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, पाषाण या ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यास रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या पंधरा जुलैपर्यंत ही मोहिम पुण्यासह राज्यभर सुरु राहणार आहे.
‘लोकमत’च्या सहकार्याने पोलीस मित्र शांतीदूत परिवार, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय), वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) डीएमकेएच अॅण्ड कंपनी, राठी आणि कंपनी यांच्यातर्फे शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. पोलीस मित्र शांती दूत परिवार, भवानी पेठ येथे ओम ब्लड बँक यांच्या सहयोगाने शिबिर घेण्यात आले. यावेळी सदाशिव कुंदेन, अकबर मेमन तसेच सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव , डॉ. चंद्रकांत मंडलिक, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, राम पालखे, सुनील मेमाणे, अमित देवळेकर, मोईन चौधरी, किरण कांबळे, साजिद शेख, स्वाती गायकवाड, सिंधू शेलार आदी उपस्थित होते.
आयसीएआयतर्फे बिबवेवाडी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात एकूण सव्वादोनशे जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास आयसीएआयचे केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशीनाथ पठारे, ‘विकासा’चे उपाध्यक्ष अथर्व खुर्द, सदस्य प्राची शर्मा, सीए अजयकुमार राजे, कार्यालयीन व्यवस्थापक दीपक कोरगावकर आदी उपस्थित होते.
शनिवारी पुण्यात आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे केईएम रक्तपेढीच्या सहकार्याने १७, डीएमकेएच, फॉरचुन हाऊस, बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथे डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँक पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने ३९ आणि राठी अँड राठी कंपनी, कमल कीर्ती, सिंहगड रस्ता येथे पूना हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या सहकार्याने ६५ जणांनी रक्तदान केले. सीए सुहास बोरा, सीए मोहित अगरवाल, सीए दिनेश मुंदडा, सीए शैलेंद्र पवार, सीए शैलेश राठी, सीए पराग राठी, सीए विक्रांत साळुंके, सीए निलेश देशमुख यांनी यामध्ये पुढाकार घेतला.
चौकट
“कोरोनामुळे सध्या अनेक रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे ‘लोकमत’च्या उपक्रमात सीए दिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.”
-सीए समीर लड्डा ,अध्यक्ष,आयसीएआय, पुणे शाखा