विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजनासाठी ई- पीक पाहणी उपयुक्त ठरणार असून, ही प्रक्रिया गतीने राबवावी व शेतकरी बांधवांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिले होते. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तलाठी बबन लंघे यांनी मोबाईल व्हॅन ही संकल्पना राबविली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार वाहनाच्या चारही बाजूंनी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. त्यामध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बोलीभाषेतील संवाद प्रणालीने उपयुक्त माहिती देण्यात आली. यावेळी ई-पीक पाहणी ॲपचा लाईव्ह डेमो दाखविण्यात आला. तसेच अधिक माहितीसाठी छापील पत्रके देखील वाटण्यात आली. यासाठी त्यांना तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे व मंडल अधिकारी सविता घुमटकर यांनी प्रोत्साहन दिले.
ई- पीक पाहणी ॲप हे पीक पेरणी अहवालाचा ''रियल टाइम क्रॉप डेटा'' संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग मिळवणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ई-पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवावा, असे आवाहन तलाठी बी. के. लंघे यांनी यावेळी केले.
२८ राजगुरुनगर
ई-पीक पाहणी ॲपबाबत शेतकऱ्यांना माहिती देताना बी. के. लंघे.