पुणे : कोरोनामुळे अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बहुतांश सर्व परीक्षा केंद्रांवर ८० ते ९० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. फेब्रुवारीपासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर गुरूवारी पार पडल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, परीक्षेच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोना परिस्थितीमुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली. परिणामी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास बराच कालावधी मिळाला. परंतु, केव्हा एकदाची परीक्षा होते, अशी भावना अनेक विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात होती. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही ऑफलाईन परीक्षा होत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनासुध्दा प्रत्यक्ष शाळेत येणे शक्य होत नाही. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शाळेत येता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
कोरोना नियमाचे पालन करून शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी सुध्दा कोरोनाविषयक खबरदारी घेत परीक्षा दिली. काही अपवाद वगळता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुरळीतपणे शिष्यवृत्ती परीक्षा दिली.
-------------------
दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेले जिल्ह्यातील विद्यार्थी : ५२,२६८
पाचवी शिष्यवृत्तीचे विद्यार्थी : ३५,१४२
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे केंद्र : २९०
आठवी शिष्यवृत्तीचे विद्यार्थी : १७,१२६
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे केंद्र : १५९
-----------------------------