पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटीक रनिंग ट्रॅक एरवी या ट्रॅकच्या आजुबाजूलाही कोणाला फिरकू दिले जात नाही. त्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात. योग्य शूज घातल्याशिवाय धावपटूही या ट्रॅकवर पाय ठेवत नाहीत. मात्र राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २६) या रनिंग ट्रॅकवर वाहनांचे ताफे नेले. रनिंग ट्रॅकवर कसे वावरावे याचे मुलभूत ज्ञान नसलेली ही मंडळी ‘क्रीडा विद्यापीठ’ काय काढणार असा संताप धावपटूंकडून व्यक्त होत आहे.
नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी या संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात उपस्थित झाला होता. या मंडळींच्या वाहनांनी सर्व नियम धाब्यावर बसवत रनिंग ट्रॅकवरुन वाहने नेली. यावेळी सुरक्षा रक्षक निमूट पाहण्याशिवाय काही करु शकले नाहीत.
क्रीडा विद्यापीठाची घोषणा, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे ध्येय, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात अशी भूमिका मांडली जात असताना राज्यकर्ते, नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनावर क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलातल्या अॅथलेटिक्स मैदानावरील रनिंग ट्रॅक आधीच खराब झालेला आहे. त्यात या ट्रॅकवर शनिवारी अनेक वाहनांची ये-जा झाली. क्रीडा क्षेत्रातल्या मुलभूत नियमांचे पालन न करणारे मंत्री-प्रशासन क्रीडा विद्यापीठातून काय धडे देणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
चौकट
क्रिकेटच्या मैदानावर हे घडले असते का?
अॅथलेटिक्स मैदान १९९४ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यानंतर २००७-०८ मध्ये या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत याच मैदानावर अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात या मैदानावर कोणतीही स्पर्धा होऊ शकलेली नाही. नियोजित क्रीडा विद्यापीठामुळे या रनिंग ट्रॅकचा चेहरामोहरा बदलेल अशी अपेक्षा खेळाडूंना आहे. मात्र शनिवारच्या बेजबाबदारपणामुळे या अपेक्षांना सुरुंग लागला आहे. क्रिकेटच्या मैदानावर, धावपट्टीवर या पद्धतीने गाड्यांचा ताफा जाऊ दिला गेला असता का, असाही प्रश्न खेळाडू उपस्थित करतात.
चौकट
क्रीडामंत्री केदार म्हणतात...
“क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर हे सर्व प्रकार बंद केले जातील. यापुढे कोणत्याही मैदानावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व मैदानांची योग्य ती काळजी घेतली जाईल,” अशी प्रतिक्रिया क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली. मात्र आजच्या बेपर्वाईची जबाबदारी कोणावर हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
फोटो - रनिंग ट्रॅक