पुणे : महापालिकेच्या क्रीडा समितीच्या बुधवारच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने समितीचे सदस्य चांगलेच भडकले. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली. केंद्रीय मंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा क्रीडापटूंचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाची माहितीच सदस्यांना दिलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही माहिती सदस्यांपासून का लपविली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्रीडा समितीचे उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी पालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. येत्या १२ फेब्रुवारी रोजी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या आजी-माजी खेळाडूंना पालिकेच्या वतीने गौरविणार आहे. तसेच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची माहितीच क्रीडा समितीच्या सदस्यांना दिलेली नव्हती. बुधवारी नियोजित करण्यात आलेल्या बैठकीलाही अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली. प्रत्यक्षात नाही पण ऑनलाईन पद्धतीने एकही अधिकारी उपस्थित नव्हता.
कार्यक्रमाची माहिती न देणे आणि बैठकांना अधिकारी उपस्थित न राहणे या दोन्ही गोष्टी गांभीर्याने घेतल्या जाव्यात. तसेच कार्यक्रमांची आगाऊ माहिती सदस्यांना देण्यासोबतच अधिकाऱ्यांनी बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्याची मागणी चोरबेले यांनी केली आहे.