पुणे: पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना परिस्थितीत सुधारणा झाली आहे. शाळा, महाविद्यालये कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे सुरू झाली आहेत. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत (बीओई) विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु, बीओईच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यासाठी चारही अधिष्ठात्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यात परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन किंवा दोन्ही पध्दतीने परीक्षा घ्यावी, यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
परीक्षा ऑफलाईन ही काळाची गरज
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच परीक्षा या ऑफलाईन होणे ही काळाची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडूनही सांगितले जात आहे. परंतु, काही विद्यार्थी संघटनांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. त्यामुळे परीक्षा कोणत्या पध्दतीने होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.