पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर पदवीच्या ७८ अभ्यासक्रमांसाठी यंदा १४ हजार ४४२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत, तर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये १८ हजार २७० अर्ज प्राप्त झाले हाेते. गतवर्षीच्या तुलनेत प्रवेश अर्जात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी यंदा एम.एसस्सी. केमिस्ट्री, मायक्राेबायाेलाॅजी आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयाला सर्वाधिक पसंती दिली आहे.
केमिस्ट्री विषयाच्या अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक २ हजार ६३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या पाठाेपाठ मायक्राेबायाेलाॅजी, कॉम्प्युटर सायन्स, एमएसस्सी व्हायराेलाॅजी, मानसशास्त्र, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, एलएलएम अर्थशास्त्र आणि जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे, तर हिंदी साहित्य आणि प्रयाेजनमूलक हिंदी, एम.ए संस्कृत तसेच एम.ए. इन बुद्धिस्ट स्टडीज, पाली तसेच परकीय भाषा विभागातील एम.ए.इन फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन आणि जापनीस या अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत.
विद्यापीठ कॅम्पसमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दि. १० मे राेजी ऑनलाइन माध्यमातून अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली हाेती. तसेच विलंब शुल्कासह प्रवेश अर्ज करण्यासाठी ८ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली हाेती. अनेक विभागात प्रवेशक्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्याने यंदा थेट प्रवेश मिळणार आहे, तर इतर विभागांत परीक्षेचे आयाेजन करून मेरिटनुसार प्रवेश हाेतील.
या अभ्यासक्रमाकडे फिरवली पाठ
एम. ए. इन इंडियन लाॅजिक ॲन्ड एपिस्टेमाेलाॅजी आणि एम.ए. संस्कृत लिंग्वीस्टिक्स या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता ३० असून, अनुक्रमे ० आणि १ प्रवेश अर्ज आले तर सेंटर फाॅर परफाॅर्मिंग आर्टसच्या एम.ए. डान्स, ड्रामा म्युझिक या तीन विषयांत अनुक्रमे ३, १ आणि ४ प्रवेश अर्ज आले आहेत.
सर्वाधिक प्रवेश झालेले दहा विभाग :
विभाग / प्रवेश अर्ज / प्रवेशक्षमता
एमएसस्सी केमिस्ट्री / २०६३/ १३५
मायक्राेबायाेलाॅजी / ११२६/ ४०
कॉम्प्युटर सायन्स / १०३९ / ६०
व्हायराेलाॅजी ७१९ / २०
मानसशास्त्र ६६६/ ३४
स्टॅटीस्टिक्स ६४८ / ५०
फिजिक्स ५९३ / ९०
एलएलएम ५७७/ ६०
अर्थशास्त्र ५५५ / ५०
जर्नालिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन ४४८/ ३६