पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने अधिसभेतच परीक्षा विभागाच्या चाैकशीसाठी समितीची स्थापना केली हाेती. विद्यापीठात मंगळवारी पहिली बैठक पार पडली.
काेविड प्रादुर्भाव ओसरल्यानंतर दीड वर्षांचा कालावधी झाला मात्र, परीक्षा विभागाचे कामकाज अद्याप सुरळीत झाले नाही. त्याचा फटका लाखाे विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत यावर वादळी चर्चा झाली. तसेच परीक्षा विभागाची चाैकशी, परीक्षेचे वेळापत्रक सुरळीत व्हावे यासाठी प्रा. डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली हाेती. दरम्यान, या चाैकशी समितीची विद्यापीठ परिसरात मंगळवारी (दि.११) बैठक पार पडली. यावेळी सदस्यांकडून परीक्षा विभागातील विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
परीक्षेला उशीर का हाेताे?, परीक्षा पार पडल्यानंतर निकाल लागण्यास उशीर का हाेताे?, निकालानंतर ट्रान्स्क्रीप्ट मिळण्यास उशीर का हाेताे आहे? यासंदर्भात संबंधित विभागाकडून माहिती मागविल्याचे समितीतील सदस्याने सांगितले. दरम्यान, चाैकशीत परीक्षा वेळेत पार न पडण्यास काेणत्या गाेष्टी कारणीभूत आहेत याचा शाेध घेण्यात येणार आहे.
विभागास तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज :
गत दहा वर्षांत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाची संख्या दुपटीने वाढली. विद्यार्थ्यांची संख्याही साडेचार लाखांवरून साडेसात लाख झाली आहे. अभ्यासक्रमाची संख्याही वाढली; मात्र परीक्षा विभागाच्या मनुष्यबळात वाढ झालेली नाही. अनेक वर्षांपासून १३६ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामकाज चालते. त्यामुळे परीक्षा विभागाच्या कारभाराला गती मिळण्यासाठी तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळाची गरज आहे.