पुणे : राज्यातील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात पाच वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम (पदवी आणि पदव्युत्तर एकत्रित) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.
पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोसावी बोलत होते. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ. मनोहर चासकर, डॉ. विजय खरे, सिनेट सदस्य प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते.
डॉ. गोसावी म्हणाले की, विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासह नवीन शैक्षणिक धाेरण प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यापीठ संकुलातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये दोन वर्षांचे पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रम सुरू आहेत. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम एक वर्षाचा होणार आहे. त्यादृष्टीने पाच वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र, हे करताना सामान्य तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्याचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळात प्राध्यापक भरती करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे तसेच ग्रीन हायड्राेजनवर संशाेधनावर भर देण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि त्यातून राेजगार निर्मित्ती कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. क्लस्टर विद्यापीठांच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्रोत बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यापीठातील विभागाला भेट देत शैक्षणिक आढावा घेणार असल्याचेही गाेसावी म्हणाले.