पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे आयाेजन करण्यात आले आहे. प्रवेश परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास शनिवार, २० एप्रिलपासून सुरुवात हाेणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या १० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे अशी माहिती उपकुलसचिव डाॅ. एम.व्ही रासवे यांनी दिली.
विद्यापीठाच्या विविध विभाग, केंद्र आणि प्रशाळांमध्ये विविध ९१ एकात्मिक तसेच आंतरविद्याशाखीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी ३ हजार ८३२ एवढी प्रवेश क्षमता आहे. विविध विभागांमध्ये प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जातात. शंभर गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तसेच काही विभागांव्दारे वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक लेखी स्वरूपात परीक्षा घेतली जाते. प्रवेश परीक्षेसाठी https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx य संंकेतस्थळावर २० एप्रिल ते १० मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सामान्य प्रवर्गासाठी ६०० तर राखीव प्रवर्गासाठी ४०० रूपये परीक्षा शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरावे लागणार आहे. तसेच अर्ज करताना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, नाॅन क्रिमिलेअर, वैद्यकीय प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलाेड करावी लागणार आहेत.
१३ ते १६ जून या कालावधीत प्रवेश परीक्षा
विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रम १३ जून आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी १४ ते १६ जून या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
नकारात्मक गुण पद्धत लागू असणार
ऑनलाईन माध्यमातून २ तास कालावधीत १०० गुणांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यामध्ये २० गुण सामान्य ज्ञान, याेग्यता, तर्क, आकलन तसेच संबंधित विषयाशी निगडित ८० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेला नकारात्मक गुण पद्धत लागू आहे.