पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ईएमएमआरसी विभागाने तयार केलेल्या “पवित्र उपवन” या माहितीपटाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या वसुंधरा लघुपट महोत्सवात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस, पर्यावरण मंत्री मा. रामदास कदम, राज्यमंत्री मा. प्रवीण पोटे पाटील, युवसेनेचे अध्यक्ष मा. आदित्य ठाकरे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वसुंधरा लघुपट स्पर्धा गेल्या १२ वर्षापासून आयोजित केली जाते. यामध्ये व्यावसायिक आणि हौशी असे दोन गट केले होते. विद्यापीठाच्या ईएमएमआरसी विभागाने “देवराई” या विषयावर डॉक्युमेन्ट्री तयार केली आहे. यामध्ये पुणे परिसरातील आणि कोकणामधील देवरायांचा अभ्यास करून तिथे चित्रीकरण केले आहे. शासकीय पातळीवर तसचं स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी नवीन वनरायांची निर्मिती करून त्याचं संवर्धन करावे या हेतूने या डॉक्युमेन्ट्रीची निर्मिती केली आहे.
ईएमएमआरसी विभागाकडून देवराई या डॉक्युमेन्ट्री साठी लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केले आहे. तर निर्माता म्हणून विवेक नाबर यांनी काम पहिले आहे. याशिवाय कॅमेरा ची जबाबदारी इरफान कार्नाळकर आणि वसिम पठाण यांनी घेतली होती. ग्राफिक्स साठी विनोद काळगी आणि अमृता घोडे तर ध्वनीसाठी राम जाधव, तानाजी सुतार, प्रदीप भोसले, आणि सहाय्यक म्हणून सिलास काकडे, सिल्वराज पिल्ले, फय्याज शेख यांनी काम पहिले.
विभागाचे अधिष्ठाता आणि ईएमएमआरसी चे विभागप्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या डॉक्युमेन्ट्री साठी महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी यांचेही योगदान आहे.