मुंढवा: मुंढवा येथील मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून जलपर्णी वाढल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच केशवनगर येथील तब्बल १०५ नागरिकांचे सह्यांचे तक्रारी अर्ज केले होते. त्यानंतर तातडीने मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने केशवनगर येथील वॉर्ड क्र. ३ येथील गजानन महाराज मंदिर ते दत्त मंदिर संपूर्ण ओढ्याची बाजू डासप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली.
केशवनगर हद्दीत मुळा-मुठा नदीवर जॅकवेल बंधारा असल्याने येथील नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथील नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा तक्रारी अर्ज येथील ग्रामस्थ अनिल भांडवलकर, दिलीप भंडारी, शशिकुमार लोखंडे, महेश गिरी, क्षितीज लोणकर, शंकर गायकवाड यांनी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयास केला होता. त्यानंतरही यासंदर्भात लोकमतने बातमीही प्रसिद्ध केली होती.याची दखल घेऊन हडपसर क्षेत्रीय कार्यालयचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या आदेशान्वये कीटकनाशक विभागाचे तुकाराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र धायरकर यांच्या मदतीने महेश भारवासी, सुजित धोत्रे व यशवंत जाधव या कर्मचाऱ्यांनी सोमवार दि. २६ एप्रिल रोजी वॉर्ड क्र ३ ओढ्याची किनार, गजानन महाराज मंदिर ते दत्त मंदिर संपूर्ण ओढ्याची बाजू मच्छर औषधफवारणी करून घेण्यात आली.
केशवनगर भागात जलपर्णी साचल्याने प्रमुख कारण खडकीपासून पुढे वाहत ती मुंढवा-केशवनगरजवळील नदीपात्रात साठून राहत आहे. याच जलपर्णीचा त्रास मुंढवा-केशवनगर, खराडी-वडगावशेरी भागातील नागरिकांना होत आहे. केशवनगरमध्ये कीटकनाशक फवारणी करण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावण्याची गरज आहे. केशवनगर भागातील डासांमुळे नागरिक डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराने ग्रस्त झाल्यास नागरिकांना हॉस्पिटलसाठीही आता पैसे नसल्याचे नागरिक सांगत आहेत. आधीच कोरोनाने लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. व्यवसाय ठप्प आहे. तरी नदीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औषधफवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
फोटो ओळः केशवनगर येथील वॉर्ड क्र. ३ येथील गजानन महाराज मंदिर ते दत्त मंदिर संपूर्ण ओढ्याची बाजू डासप्रतिबंधक औषधफवारणी करण्यात आली.