अवसरी : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत केंद्रीय उपसचिव करमवीर सिंह यांनी व्यक्त केले. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे ‘ग्रामउदय से भारतउदय अभियान’ या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रथमच शेतकऱ्यांसाठी किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सिंह बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी स्मिा पाटील, पंचायत समिती सदस्या सुषमा शिंदे, सभापती जयश्री डोके, उपसभापती सुभाष तळपे, सरपंच शकुंतला शिंदे, उपसरपंच नीलेश टेमकर, ग्रामपंचायत सदस्य माजी सभापती आनंद शिंदे, संचालक दगडू शिंदे, माऊली गावडे, तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव आदी उपस्थित होते. या मेळाव्यात सिंह यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. शेततळ््याचे अनुदान वाढवून मिळाले पाहिजे. ज्या महिलांच्या नावावर जमिनीचा सात-बारा आहे. अशा महिलांना १०० टक्के अनुदान मिळवून दिले पाहिजे. शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा, बटाटा, ऊस, तरकारी मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा मागण्या गावडेवाडीच्या माजी सरपंच मनीषा गावडे, चेअरमन बाळासाहेब गावडे, यमनाजी भोर, नीलेश टेमकर यांनी केल्या. अवसरी खुर्द गावचे उपसरपंच नीलेश टेमकर यांनी बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, यात्रांचा हंगाम चालू झाला. खोऱ्यातील लोकांचे एकमेव करमणुकीचे साधन आहे. त्यामुळे आपण आमचे म्हणणे संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवावे, असे सांगितले. या वेळी पत्रकार डी. के. वळसे-पाटील, मनीषा गावडे, स्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सभापती जयश्री डोके यांनी कांदाचाळीचे अनुदान अद्यापपर्यंत न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. सिंह यांनी गावडेवाडी गावाला भेट दिली. गावाची प्रशंसा केली. गावडेवाडी हे गाव आदर्श मॉडेल असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शिंदे यांनी केले. माजी सरपंच कल्याण शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)छायाचित्र ओळी : अवसरी खुर्द येथे ‘ग्रामउदय से भारतउदय अभियाना’त किसानसभेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय उपसचिव करमवीर सिंह.
योजनांचा लाभ पोहोचवावा
By admin | Published: April 20, 2016 12:46 AM