किरण शिंदे
पुणे: मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयाकडून चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केले. पुण्यातील प्रसिद्ध गरवारे महाविद्यालयाजवळ आज दुपारच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झालाय. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि जखमी करून गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आरोपीची मैत्री आणि जखमी तरुण एकमेकांच्या ओळखीचे आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास जखमी तरुण आरोपीच्या मैत्रिणीसोबत बोलत होता. यावेळी या तरुणीने माझे विषयी अफवा पसरवतो का असे म्हणत झालेला प्रकार आपल्या आरोपी मित्राला सांगितला. त्यानंतर आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर हातात कुलथे घेऊन या आरोपींनी जखमी तरुणाचा पाठलाग सुरू केला. गरवारे महाविद्यालयापासून ते एरंडवण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी हातात कोयते घेऊन पाठलाग करत होते. भर दुपारी आणि गर्दीच्या वेळी हा संपूर्ण प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
दरम्यान आरोपींनी जखमी तरुण आणि त्याच्या भावाला संजीवनी हॉस्पिटलजवळ गाठले आणि कोयत्याने वार केले. यात एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान कोयत्याने वार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके सध्या या आरोपींच्या मार्गावर आहे. मात्र भर वर्दळीच्या ठिकाणी महाविद्यालयालगत हा संपूर्ण प्रकार घडल्याने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.