लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:59 AM2024-05-11T11:59:27+5:302024-05-11T12:00:12+5:30
४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले....
पुणे : लोकशाहीच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकीय क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरवत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भाजपविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये लाट आहे असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. ४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राऊत यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले. राऊत म्हणाले, सरकारी यंत्रणाचा इतका मोठा गैरवापर याआधीच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता. वेठीला धरल्यासारखे सरकारी यंत्रणांना वागवले जात आहे. हा राजकीय क्षेत्रात दहशत पसरविण्याचाच प्रकार आहे.
देशाचे वातावरण पाहण्यासाठी म्हणून आपण काही राज्यात गेलो होतो असे राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश या त्यांना त्यांच्या वाटणाऱ्या राज्यासह अनेक राज्यांमध्ये सामान्य जनतेमध्ये भाजपच्या राजकारणाचा राग आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी राजकारणाचा जो काही प्रकार केला तो जनतेला आवडलेला नाही. मतदार मतपेटीतून त्यांना याचे बरोबर उत्तर देतील असा दावा राऊत यांनी केला.
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासूनच देशाची राज्यघटना, इतकेच काय तिरंगी ध्वजही मान्य नाही. त्यामुळे राज्यघटना बदलण्यासाठी म्हणूनच त्यांना लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा हव्यात. तसे नसेल तर त्यांनी देशातील जनतेला ते सांगावे असे राऊत म्हणाले.