पुणे : झाड हेच माणसांचा श्वास असून, त्यामुळेच आपण जीवंत आहोत. त्यामुळे त्यांना जपणे आवश्यक आहे. झाडांचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील सांगितले होते आणि गडांवर वृक्षराजी बहरू दिली होती. पण नंतरच्या काळात अनेक गडांवरील झाडे कमी झाली. आता पुन्हा गड-किल्ले हिरवाईने नटविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन येत्या शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
झाडांची मूळ ओलावा शोधत राहतात. घट्ट होत जातात. तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधून काढतात. नातं घट्ट करतात. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आता वृक्षांसाठी काम करणाऱ्यांना एकत्र आणण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या शिवसुर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. आणि हा जन्मदिवस महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव म्हणून आपण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करत असतो. प्रत्येक गडकिल्ल्यावर सुमारे ४०० रोपं लावण्यात येणार आहेत. चला तर मग शिवरायांना आपल्या जवळील गडकिल्यावर, देवराई मध्ये तसेच जिथे गडकिल्ले नाही तिथे "वृक्षदिंडी" काढून ज्या झाडाची वृक्षदिंडी काढली, त्या झाडाच्या नावाने उदा. वडाच्या नावाने चांगभलं म्हणून झाड लावायचे आहे. त्याचे संगोपन करून, दरवर्षी शिवजयंती या जगवलेल्या झाडाच्या वाढदिवसाने साजरी करून "मानवंदना" देऊया. आणि या छोट्या परंतु महत्वाच्या उपक्रमाचे फोटो, व्हिडीओ ची एक चित्रफीत तयार करून सहृ्याद्री देवराईकडे पाठवायचे आहे.——————————————शिवरायांचे गडकिल्ले बोडके झाले आहेत. त्यांना परत हिरवाईने फुलवू या. गडकिल्ल्यांवर देशी झाडे लावून शिवजयंती साजरी करूया. प्रत्येक शिवजयंतीला या झाडांचा वाढदिवस साजरा करू आणि शिवरायांना आगळेवेगळी मानवंदना देऊया.- सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते