ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 26 - तरुणीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून संगणक अभियंता अंतरा देवानंद दास (वय २३, रा. पश्चिम बंगाल) यांचा खून करण्यात आला. तळवडे येथील कॅनबे कंपनी चौकात ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपविला असून तपासासाठी पथक बंगळूरला रवाना झाले आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरा मूळची पश्चिम बंगालची आहे. तळवडे येथील कॅनबे चौकातून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अंतरा पायी जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केले. तेथून हल्लेखोर पसार झाला. त्या वेळी फिर्यादी सत्येंद्र कृष्णानंद शिंपी हे कामावरून घरी जात होते. त्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या अंतराला पाहिले. तिला त्वरित चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपींनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अंतराकडील पर्समध्ये सापडलेल्या कागदपत्रांवर पश्चिम बंगालचा पत्ता आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती बंगळूर येथील कंपनीत कामास होती. गेल्या सहा महिन्यापूर्वी ती पुण्यात आली होती. प्राधिकरणात पेर्इंग गेस्ट म्हणून राहत होती. तळवडेतील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करीत होती.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला तसेच तिच्या आईवडीलांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. दागिन्याच्या उद्देशाने तिचा खून झाला नसल्याचे पोलिसांचे मत आहे. अंतराच्या मित्र मैत्रिणींची भेट पोलिसांनी घेतली असून त्यानुसार तपास सुरू केला आहे. तसेच बंगळूरला पोलीस पथक रवाना झाले आहे.