पुणे : भारताने दिलेली बुद्ध तत्त्वज्ञानाची संपत्ती जगभर पसरली. परंतु, भारतात मात्र ती शिल्लक राहिली नाही. ही संपदा श्रीलंकेने त्यांच्या विद्वानांना जपून ठेवली व आम्हाला धर्मानंद कोसंबींच्या साहित्यातून पुन्हा परत दिली. याबद्दल मी श्रीलंकेच्या ज्ञानसाधनेला वंदन करतो, असे प्रतिपादन प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी केले. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे नुकतेच ‘आंतरराष्ट्रीय समता साहित्य संमेलन’ पार पडले. प्रो. धर्मानंद कोसंबी लिखित ‘बुद्धदर्शन लीलासंग्रह’ या मराठी ग्रंथाचा हिंदी अनुवाद प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी केला. त्याचा लोकार्पण समारंभ या आंतरराष्ट्रीय समता साहित्य संमेलनात करण्यात आला.भारत व श्रीलंका मैत्री संघाच्या वतीने महावेली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्रीलंकेचे शिक्षणमंत्री राधाकृष्णन, प्रसिद्ध सिंहली विद्वान एडविन आर्यदास, श्रीलंका विद्यापीठाचे इतिहास आणि कला विभागाचे प्रमुख चंद्रगुप्त थेनुवरा उपस्थित होते. श्रीलंकेचे शिक्षणमंत्री मा. राधाकृष्णन यांनी हा ग्रंथ सिंहली भाषेचे प्रख्यात विद्वान एडविन आर्यदास यांना समर्पित केला. एडविन आर्यदास यांनी विद्येचे महत्त्व सांगून या ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद करण्याची घोषणा केली.केलानिया विद्यापीठाचे भाषाशास्त्रप्रमुख भदंत आनंदकीर्ती म्हणाले, की आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या विचारांनी आम्ही रोमांचित झालो. त्यांनी श्रीलंकेत येऊन आम्हाला त्यांच्या साहित्य विचाराचा लाभ द्यावा. समता साहित्य अकादमीचे अध्यक्ष आयुष्यमान दयानंद तांडेकर यांनी समारोप केला. केलानिया विद्यापीठाच्या हिंदी विभागात प्रा. रतनलाल सोनग्रा यांची विद्यार्थ्यांबरोबर हिंदी साहित्यावर चर्चा करण्यात आली. श्रीलंकेच्या विद्यालंकार विद्यापीठात ज्या ठिकाणी महापंडित राहुल सांकृत्यायन, भदंत आनंद कौशल्यायन आदी विद्वान महाचार्यांनी हिंदी, पाली आणि तत्त्वज्ञान विभाग समृद्ध केला. तेथे प्रा. रतनलाल सोनग्रा यांचा बुद्धमूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीलंकेने जपले बुद्ध तत्त्वज्ञान
By admin | Published: November 25, 2015 1:09 AM