पुणे- व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्या वागण्यातून तिचा निगर्वीपणा जाणवला तर ती जमिनीवर आहे असे म्हणायला हवे...ती तशीच होती...साधी सरळ आणि मेकअप शिवाय बघितली तर लक्षातही येणार नाही इतका साधेपणा तिच्यात होता...आजही त्या आठवणींना ३० नाही तर ३ वर्षांचा ताजेपणा आहे. ...पुण्याच्या मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रॉचे संस्थापक सदस्य प्रमोदकुमार सराफ अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणी जागवत होते. रविवारची सकाळ भारतीय सिनेरसिकांसाठी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने साऱ्यांनाच हळहळ वाटली. अनेक जण आपल्या लाडक्या 'चांदनी'च्या आठवणींवर प्रकाश टाकत होते. त्यातील एक नाव म्हणजे मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रॉचे प्रमोदकुमार सराफ. साधारण १९८७साली पुरस्कार सोहळे किंवा रियालिटी शो असं काहीही नसल्याने सिनेकलाकारांना कार्यक्रम करण्यासाठी ऑर्केस्ट्रॉच्या कार्यक्रमाशिवाय पर्याय नसायचा. याला श्रीदेवी यासुद्धा अपवाद नव्हत्या. त्यांना भारताबाहेर अनेक कार्यक्रमांची निमंत्रणे येत होती. मात्र एकटीने दोन तासांचा शो करणे अशक्य असल्याने त्यांनी मेलडी मेकर्ससोबत दौरे काढण्यास सुरुवात केली. याबाबत सराफ यांना विचारले असता त्यांनी त्यावेळच्या तालमी जुहू येथील हॉलिडे इन हॉटेलमध्ये चालायचे असे सांगितले. पुढे ते म्हणाले की, श्रीदेवी साध्या तर होत्याच पण प्रचंड कष्टाळू होत्या. सच्चा कलाकाराकडे लागणारी जिद्द आणि चिकाटी त्यांच्यात पुरेपूर होती. नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून नृत्याचे धडे घेताना अनेकदा सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतही त्यांचा सराव सुरु असायचा.त्यावेळीही कोणतीही नवी गोष्ट शिकताना त्यांचा उत्साह वाखडण्याजोगा असायचा असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. दौऱ्यात त्यांच्यासोबत आई आणि बहीणही असायच्या. मात्र तरीही प्रत्येक सहकाऱ्याला काय हवं नको याकडे त्यांचे व्यक्तिशः लक्ष असायचे. कितीही वेळ तालम चालली तरी तितक्याच थकणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. नागीन चित्रपटातलं गाणं सादर करताना त्यांना अक्षरशः जमिनीवर लोळण घ्यावी लागायची. त्याप्रकारचे नागीन नृत्य करतानाही त्या अत्यंत सहजपणे वावरत असायच्या. त्यांच्या प्रत्येक नृत्यानंतर प्रेक्षक प्रचंड खुश असायचे. त्याकाळात इतकी प्रसिद्धी मिळाल्यावरही रंगमंचावर त्यांचं स्वतःला झोकून काम करणं सुरूच होतं. सादरीकरणासाठी रंगमंच असो किंवा सत्तर एम.एम.चा पडदा. श्रीदेवी त्यांच्यातल्या वेगळेपणामुळे कायमच उठून दिसल्या यात शंका नाही.-----------------
भाषेचा अडसर नाहीच !श्रीदेवी यांची जन्मभाषा तामिळ होती. त्यामुळे हिंदी आणि काही वेळा इंग्रजीही बोलताना त्यांना अडचण यायची. पण तरीही कलेची भाषा आत्मसात केल्यामुळे त्या जमेल तशी आणि समोरच्याला समजेल अशा भाषेत त्या बोलत होत्या असेही सराफ यांनी सांगितले.