पुणे: बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चौकात गुरुवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण - कालियामर्दन असा भव्य ३० फूट उंचीचा हलता देखावा एलईडी लाईटमध्ये साकारण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.
गुरुवारी दुपारी ४ ते ५ यावेळेत पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा वादनाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. तसेच दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून दहीहंडी फोडणा-या गोविंदा पथकास रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुण्यासह मुंबई, बारामती, कोल्हापूर आदी शहरातील गोविंदा पथके देखील येतात. त्यामुळे पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाच्या दहीहंडी सोहळ्यास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.