अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:32 PM2024-03-18T14:32:50+5:302024-03-18T14:45:59+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशी निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशी निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीकर कोणाला साथ देणार यावर चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. दरम्यान, आता पवार कुटुंबातील सर्व सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. कालपासून अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुळेंचा प्रचार सुरू केला आहे.
अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले
काल बारामती येथील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शर्मिला पवार यांनी आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
काटेवाडीत बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या,आपल्याला कधी कधी आयुष्यात कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ सर्वांसाठी कठीण आहे. ज्या वेदना आज आम्हाला होत आहेत त्या वेदना तुम्हालाही होत आहेत, आपल्या कुटुंबात कधी असं घडलं नव्हतं. आपल्या सगळ्यांच्या घरी वडिलधारी लोक आहेत. आपल्या बारामतीची बाहेर ओळख शरद पवार साहेबांमुळे आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आपल्या घरातील वडिलधारी लोकांचा मान राखला पाहिजे. आपल्याला ज्याला त्याला माहिती असतं वडिलांनी किती कष्ट केलं आहे. ज्यांनी आपल्याला वाढवलं आहे त्यांना आपण कधी टोमणे मारणार का?, असंही शर्मिला पवार म्हणाल्या.
"आज आपण घेतलेली बैठक, ही सर्व पक्षीयांची आहे. आपण सर्वांनी शरद पवार यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार साहेबांना राजकारणात येऊन ६० वर्ष झाली आहेत. या राजकीय आयुष्यात कधी साहेबांचा पराजय झालाय का? मग आता आपण त्याला कारणीभूत व्हायचं का? हे पटत नाही आपल्या मनाला, आपल्याला कोण आलं, कुठून आलं, कोणाला यश मिळतंय हा मुद्दाच नाही. आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, असंही शर्मिला पवार म्हणाल्या.