राजकारणातील गणिते सोडविणारे गणितज्ञ शरद पवार असल्याचे सिद्ध- श्रीनिवास पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 12:18 PM2024-06-06T12:18:38+5:302024-06-06T12:20:44+5:30
कन्हेरी येथील निवासस्थानी माध्यमांशी श्रीनिवास पवार बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत अजित पवार कमी पडले असे मी म्हणणार नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भरपूर प्रयत्न केले. त्यांना राजकारणाचादेखील चांगला अनुभव आहे...
बारामती : राजकारणात काही गणित असतात. ती गणिते सोडविणारे भारतातील गणितज्ञ हे शरद पवार आहेत हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकालाने सिद्ध केले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांच्या रणनीतीचे काैतुक केले.
कन्हेरी येथील निवासस्थानी माध्यमांशी श्रीनिवास पवार बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत अजित पवार कमी पडले असे मी म्हणणार नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भरपूर प्रयत्न केले. त्यांना राजकारणाचादेखील चांगला अनुभव आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, पण साहेब वस्ताद आहेत. वस्ताद हा वस्तादच असतो. अजितदादांवर जबाबदारी साेपवून त्यांनी दिल्लीत लक्ष घातले. त्यामुळे त्यांचा बारामतीचा संपर्क कमी होता. म्हणून ते त्यांचा डाव विसरले असा त्याचा अर्थ होत नसल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले.
बारामतीचा विकास झाला, विकास झाला म्हणजे नेमके काय झाले, याचे विश्लेषण झाले पाहिजे. १९६७ साली कामांची सुरुवात झाली. शरद पवार यांनी विकासकामांचा पाया रचला. सुरुवातीच्या पायऱ्या त्यांनी बांधल्या. दादांनी पुढील पायऱ्या बांधल्या, विकास हा लगेच होत नसल्याचे पवार यांनी नमूद केले. कुटुंबापासून फारकत घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परत यायचे असल्यास याबाबत सर्वस्वी निर्णय शरद पवार हे घेतील. शरद पवार मनाने मोठे आहेत, पण अजित पवार त्यांच्याकडे जातील का, हाही प्रश्न आहे. दोघांच्याही डोक्यात काय चाललेय हे कळू शकत नसल्याचे पवार म्हणाले. बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय शरद पवार, जयंत पाटील व सुप्रिया सुळे घेतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांच्या विजयाबद्दल ते म्हणाले, गेली १७ वर्षे त्या खासदार आहेत. बारामतीत त्या फार लक्ष घालत नव्हत्या, कारण इथे अजित पवार सगळे बघत होते. परंतु, इतर तालुक्यात सुप्रिया यांचा संपर्क चांगला होता. मतदार त्यांना अंतर देणार नाहीत, हे आम्हाला पक्के ठाऊक होते. एकाच घरात दोन पक्ष झाल्याने नात्यात निवडणूक झाली. निवडणुकीपुरते नाते बाजूला ठेवूनच आम्हाला ही निवडणूक लढावी लागली. प्रचार काळात शरद पवार, सुळे यांना कोणाचाही उल्लेख केला नाही, ते फक्त कामांवर आणि प्रश्नांवर बोलत राहिले. अजित पवार भावनिकतेवर बोलले, पण आम्ही तसे बोललो नाही. मतदार सूज्ञ असतो. ते बघत असतात, ऐकत असतात. या पदासाठी कोण योग्य याचा निर्णय जनतेने घेतला. नेतेमंडळी तिकडे होती, परंतु सामान्य जनता आमच्यासोबत होती. त्यांना आमदारकीला मत दिले म्हणजे जनता दावणीला बांधली असे होत नाही. जनतेचे स्वतंत्र मत असते. राजकारण हे बॅलन्सशीट नसल्याचा टोला त्यांनी लगावला. अजित पवार गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. भाजपसोबत जाण्यासाठी त्यांचे काही आडाखे असतील, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल, असे पवार म्हणाले.
राजकारणाच्या लढाईत कुटुंब पाहिले जात नाही
राजकारणातील लढाई ही जिंकताना कुटुंब पाहिले जात नाही. आपल्याला जिंकण्याच्या भावनेने काम करावे लागते. आम्ही तेच केले. शरद पवार यांच्यावर लोकांची निष्ठा, प्रेम आहे. त्यातून सुप्रिया सुळे यांचा विजय झाला, असे मत शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.
सामन्यांचा आवाज मोकळा झाला-
आमदार रोहित पवार यांनी झंझावाती प्रचार केला. त्यातून तरुणाई जागृत झाली. सामान्य जनता दबलेली होती. त्यांच्या आवाजाला मोकळीक मिळाली. याचा परिणाम मताधिक्यात झाला. अजित पवार यांनी विकास केला, विशेषत: बारामती शहरात तो केला, पण त्यांनी जे काम केले आहे, तो विकास आहे का, लोकांना तो मान्य आहे का, तो लोकांच्या उपयोगी पडतो आहे का, याचा विचार त्यांनी लोकांशी बोलून करायला हवा होता. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचा विजय झाला. मी राजकारणात येणार नाही. विधानसभेसाठी वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याचे काम करणार असल्याचे कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी सांगितले.