खंडोजी वाघे
पुणे : अयाेध्येमध्ये २२ जानेवारीला हाेणाऱ्या राम मंदिर उद्घाटन व राममूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात वेगवेगळे धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबराेबर वैयक्तिक स्तरावर, अनेक वैयक्तिक पातळीवर कलाकाैशल्यातून श्रीरामचरणी सेवा अर्पण करीत आहेत. धायरीतील कल्पना पिसे यांनी कुंदन मण्यांमधून राममूर्ती प्रतिष्ठापना साेहळा दर्शवणारे चित्र साकारले असून, त्याबद्दल त्यांचे परिसरात काैतुक हाेत आहे.
त्याविषयी सांगताना पिसे म्हणाल्या, ‘मी एक गृहिणी असून, कुंदन आर्टद्वारे वेगवेगळ्या कलाकृती साकारण्याचा मला छंद आहे. विशेषत: वेगवेगळ्या हिंदू सणांप्रसंगी मी हमखास वेळ काढून आमच्या घरात कुंदन रांगाेळी काढते. मी काेणतेही ड्राॅइंगचे औपचारिक शिक्षण घेतले नाही, मात्र आवड असल्याने मी वेगवेगळ्या रंगांच्या कुंदन मण्यांचा उपयाेग करून आतापर्यंत विविध सणानिमित्त राम, सत्यनारायण, छत्रपती शिवाजी महाराज, गीताजयंतीनिमित्त उपदेश करताना रथातील श्रीकृष्ण अर्जुन, लक्ष्मी अशी वेगवेगळ्या दैवतांची २५० चित्रे साकारली आहेत. सुरुवातीला मला अगदी तीन-तीन तास लागायची. मात्र, सरावाअंती मी आता काही मिनिटात ही चित्रे साकारते.
लागले तीन दिवस...
अयाेध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना साेहळ्यामुळे आज सर्वत्र राममहिमा गायला जात आहे. रामसेवेत आपणही काय करता येईल असा विचार करत असतानाच मला कुंदन आर्टमधून हा साेहळा साकारावा असे वाटले. त्यानुसार घरातील अगाेदरच्या कुंदन मणी आणि काही नवीन मणी विकत आणून घरातल्या चार फूट बाय चार फूट आकाराच्या टेबलवर हे चित्र मी साकारले. रामाच्या मूर्तीबराेबरच मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी मला सुमारे तीन दिवस लागले. त्यासाठी चाळीस प्रकारच्या मण्यांचा वापर केला आहे. मात्र, हे सर्व तयार झाल्यानंतर अनेकांनी माझे काैतुक केले. हे चित्र मी माझ्या इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर अनेकांनी चित्राला भरभरून पसंती दिली.
छंद करावा नेटका...
आज अनेक तरुण-तरुणी माेबाइलमध्ये रिल्स पाहण्यात वा करण्यात गुंग असल्याचे दिसून येते. त्याऐवजी कुंदन आर्टसारख्या कलेमध्ये डाेकावल्यास खूपच आगळेवेगळे समाधान लाभते. शिवाय एखादी कलाकृती साकारल्यानंतर त्या मण्यांचा पुनर्वापर करून आणखी वेगळे चित्र साकारता येते. त्यामुळे एखाद्या रांगाेळीत जसे रांगाेळीचे कलर, रांगाेळी वाया जाऊ शकते, तसे यात घडत नाही.