पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे उमेदवारआहेत. बारणे आज तर वाघेरे हे उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या मतदारसंघांचा यात समावेश आहे. यंदा पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवडमधील स्थानिक उमेदवारांमध्ये आणि दोन्ही शिवसेना गटांमध्ये लढत होत आहे.
त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. १८ ते २५ एप्रिल या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहे. २६ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, २९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत, तर १३ मे रोजी मतदान होणार आहे.
आज मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
मावळमध्ये महायुतीकडून श्रीरंग बारणे उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदींसह महायुतीतील नेते उपस्थित राहणार आहेत.
उद्या आदित्य ठाकरेंची उपस्थिती...
मावळ लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे संजोग वाघेरे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यावेळी युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.