पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस येत्या मंगळवारपासून (दि.१५) सुरुवात होत असून परीक्षेसाठी सर्व शाळा, शिक्षक व मुख्याध्यापक सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळांमध्ये परीक्षा देण्याची संधी राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे,असे आवाहन मुख्याध्यापक संघाने केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने इयत्ता दहावीच्यापरीक्षा विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळांमध्येच आयोजित करण्याचे ठरवले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळांनी परीक्षेची योग्य तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा सुरू होण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंगसाठी शाळेत लवकर उपस्थित रहावे लागणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गैरमार्गाविरोधात लढा ही मोहीम राबविली जाणार असून, कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
शिक्षकांना परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वीचे व नंतरचे नियोजन आणि वर्ग व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थी परीक्षा देताना निराश होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत शिक्षकांना सूचना दिल्या आहेत. तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे - नारायण शिंदे,अध्यक्ष,प्राथमिक शिक्षक संघटन
राज्य मंडळाने शिक्षक व मुख्याध्यापकांना परीक्षेबाबत सर्व प्रशिक्षण दिले आहे. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखांना आहेत. त्यामुळे बैठक व्यवस्था व मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण होणार नाही. परीक्षेसाठी सर्व शाळा, विद्यार्थी व पालक सज्ज आहेत. - महेंद्र गणपुले,प्रवक्ता,मुख्याध्यापक संघटना