पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमधून परीक्षेचे फॉर्म भरता येणार आहेत. बोर्डाकडून फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी 18 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह दि. 18 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान अर्ज करता येणार आहे. तर 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2021 दरम्यान विलंब शुल्कासह परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे. परिक्षेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज त्यांच्या शाळांमार्फत भरावे लागणार आहेत. अर्ज भरून घेताना सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.
मागील वर्षी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. आता फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. 4 ऑक्टोबरला राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून वर्ग भरवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.