पुणे : दहावी निकालाचा टक्का यंदा एकूणच घसरला असताना मायबोली मराठीच्या परीक्षेतही अडखळलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे. यंदा ११ लाख ९३ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी पहिली भाषा म्हणून ‘मराठी’ची परीक्षा दिली. यापैकी तब्बल २ लाख ५७ हजार ६२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मराठीची परीक्षा देणारे २१.५८ टक्के विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण सन २०१८ च्या तुलनेत खूपच जास्त आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू, सिंधी आणि बंगाली हे दहा पर्याय ‘पहिली भाषा’ म्हणून उपलब्ध होते. या सर्व भाषांमध्ये मराठी भाषेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ७८.४२ आहे. गेल्यावर्षी मराठी भाषेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे हेच प्रमाण ९०.९६ टक्के होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषा व सामाजिक शास्त्र विषयाची तोंडी परीक्षा बंद केल्यामुळे या विषयांत अनुर्त्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापन पध्दतीनुसार दिले जाणारे तोंडी परीक्षेचे गुण बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाषा विषयांच्या निकालात कमालीची घट झाली आहे..मात्र,गणित व विज्ञान विषयाचे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण बंद झालेले नाहीत. त्यामुळे या विषयांच्या निकालावर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
ssc result 2019 - अरेरे...‘मायबोली’पुढे तब्बल अडीच लाख विद्याथ्यांचे लोटांगण.!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 7:00 AM