कळस : दहावीच्या निकालानंतर अनेक घरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, कळस (ता. इंदापूर) येथील शिंदे कुटुंबीयांसाठी दहावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे पर्वणीच ठरली आहे. कुटुंबातील आई आणि मुलाने चक्क एकत्र परीक्षा देत एकत्र उत्तीर्ण होण्याचा ‘योग’ साधला आहे. एरवी आई मुलांचा अभ्यास घेते, मात्र या उदाहरणामध्ये मुलानेच आईचा अभ्यास घेऊन तिला उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केला आहे.दहावीच्या परीक्षेत मायलेकाने एकाच वेळी यशाला गवसणी घातली आहे. कळसच्या शिंदे कुटुंबाची १० बाय १० ची खोली आनंदाने उजळून निघाली आहे. शिक्षणाच्या दिव्याचा प्रकाश घरभर पसरला आहे. सुनीता शिंदे यांनी वयाच्या ४० व्या वर्षी दहावी परीक्षेत यश मिळविले असून त्यांचा मुलगा निशांतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.सुनीता यांना ४० टक्के गुण मिळाले असले तरी अनेक वर्षांपासून शिक्षणापासून दुरावल्याने हे यशही त्यांच्यासाठी हिमालयाएवढे ठरले आहे. निशांतला ६७ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांसाठी निकालाचा दिवस आनंददायी ठरला.शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हेच मनाशी बाळगून सुनीता यांना दहावी परीक्षेसाठी सतरा क्रमांकाचा अर्ज भरून तयारी सुरू केली. सहावीत असतानाच त्यांची शाळा सुटली. सहावीत असतानाच त्यांची शाळा सुटली. शाळा सुटलेल्या सुनीता शिंदे इंदापूर एमआयडीसीत काम करीत होत्या. अल्पशिक्षणामुळे पगार कमी मिळत होता. त्यामुळे त्यांनी पुढे शिकण्याचा निर्धार करून मुलासोबतच परीक्षा देण्याचे ठरविले. वयाच्या ४० व्या वर्षी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी यशही खेचून आणले.यश मिळाल्याचा आनंद़़़!शिक्षण अर्धवट सुटल्याची खंत मनात होती. पुढे शिकायचे होते. पण परिस्थितीमुळे शक्य झाले नव्हते. मुलासोबत परीक्षा देण्याचा निश्चय केला. मुलगाच अभ्यास घेत असल्याने उत्साह वाढला. सर्वांनी सहकार्य केल्याने हे यश मिळाल्याचा आनंद आहे. - सुनीता शिंदेमुलाकडून आईची शिकवणीसुनीता यांनी सतरा क्रमांकाचा अर्ज भरला असल्याने त्यांचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी निशांतने पार पाडली. आपला अभ्यास सांभाळून त्याने आईचाही अभ्यास घेतला. सुनीताला अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळता यावे, म्हणून घरातल्या कामातही त्याने हातभार लावला. त्यामुळे मायलेकाचे हे यश उल्लेखनीय ठरले आहे. कळस येथील हरणेश्वर विद्यालयातील प्रा. अर्जुन माळवे यांनीही त्यांना सहकार्य केले.
मायलेकाची यशाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:56 AM