पुणे - राज्यात शुक्रवारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यानंतर, अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक एकमेकांचे अभिनंदनही करताना दिसत आहेत. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. सगळीकडे ८०-९० टक्क्यांची चर्चा होत असताना पुण्यातील एका पट्ठ्याने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. त्याबद्दल त्यांच्या वडिलांनीही लेकाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटंलय.
शुभम जाधव असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शुभमशी संवाद साधला. त्यावेळी दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागतं. पण पोलीस बनून पुढे देशसेवा करण्याचे माझे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. शुभम हा एका होतकरू कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग या शाळेत शिकत आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. शुभम दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्यानंतर सायंकाळी घरी येऊन तो दहावीचा अभ्यास करत असे. त्यामुळेच, शुभमच्या या यशाबद्दल त्यांच्या वडिलांनाही अभिमान वाटतो.
मुलाला ३५ टक्के गुण पडल्याचे थोडसं वाईट वाटलं. पण, त्याने दुकानात काम करुन त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. मला त्याचा अभिमानही वाटतो. कारण, तो पास होतो की नाही, याचीही मला चिंता होती. मात्र, यापुढे त्याने चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण व्हावं अशी अपेक्षाही त्याचे वडिल राहुल जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी, शुभमला रडू कोसळलं, तेव्हा अरे लेका रडतोय काय, आपल्याला अजून पुढं जिंकायचंय, रडू नकोस... असे म्हणत शुभमच्या वडिलांनी पोराला धीर दिला. वडिलकीच्या नात्याने मी त्याच्या पाठिशी आहे, मी त्याला सर्व ते सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.
शुभमला पोलीस होण्याची इच्छा
दहावीत ३५ टक्के गुण मिळवल्याबाबत शुभमला काय वाटते असे विचारल्यावर तो म्हणाला, मला आनंद झाला पण एवढा नाही. मला ६० - ५० टक्कयांची अपेक्षा होती. पण तेवढे मिळले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे. माझे मित्र ५० टक्कयांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेशा खाली असल्याचे थोडे दुःख वाटते. पण दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागते. असे तो म्हणाला आहे. ''पुढे मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. मला भविष्यात पोलीस होयच आहे. मला देशासाठी चांगलं काहीतरी करण्याची इच्छा असल्याने मी पोलीस होण्याचा विचार केला आहे असेही त्याने यावेळी सांगितले आहे.''