कान्हूर मेसाई : "दादा, तुमची प्रगती पास झाली...निकाल पाहायला ती नाही..." प्राचार्य अनिल शिंदे पर्यवेक्षक किसन पांढरे यांनी प्रगतीच्या आई-बाबांना प्रगती दहावीत पास झाल्याचे सांगितले आणि पलीकडून फक्त हंबरडा ऐकू आला...कारण हा निकाल ऐकायला प्रगती आता आहेच कुठे? ती तर केव्हाच देवाघरी गेली.
कान्हूरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वीच्या वर्गात शिकणारी प्रगती किसन गोरडे (रा. फलकेवाडी) ही अत्यंत सालस, गुणी विद्यार्थिनी. वर्गातही ती फारशी बोलत नसायची. आई-वडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक. कान्हूर-मेसाईजवळील फलकेवाडी येथे शेतमजुरी करणारे हे कुटुंब. साधे सरळ जीवन जगणारे. त्यांना तिन्ही मुली... मुलगा नाही. गरिबी असूनही हसतखेळत प्रपंचाचा गाडा ओढणारे हे कुटुंब. प्रगती सर्वात थोरली... त्यामुळे तिच्यावर सारी भिस्त. प्रगतीला खूप शिकवायचे आणि तिला नर्स करायचे, असे तिचे वडील पालकसभेला आले तेव्हा शिक्षकांना सांगायचे. सर्व शिक्षकांनीही तिच्या गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने मदतीचा हात पुढे केला. पण... नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
अभ्यास करून पास व्हायचे, ह्या निर्धाराने व आपल्या गरीब आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीने अभ्यास केला. परीक्षा दिली. भूगोल विषयाचा पेपर बाकी होता. घरात खेळताना अपघात झाला आणि प्रगती मृत्युमुखी पडली. आई-वडील हबकून गेले. परिस्थिती नाजूक, त्यात हे संकट. ग्रामस्थांनी धीर दिला. जिच्याबद्दल काही स्वप्नं पाहिली होती, ती सारी धुळीला मिळाली होती.
आज दहावीचा निकाल. प्रगतीने एक पेपर न दिलेला. मात्र तरीही केवळ इतिहासाच्या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांवर प्रगती पास झाली. शाळेचा निकाल १००% लागला. प्रगती गेली, पण जाताना आपल्यामुळे शाळेचा निकाल कमी होणार नाही, याची जाणीव ठेवूनच! प्रगतीचा निकाल तिच्या आई-वडिलांना सांगताना प्राचार्य अनिल शिंदे यांना सांगितले. शाळेच्या निकालाच्या शंभर नंबरी परंपरेचा लौकिक अबाधित ठेवून देवाघरी गेलेल्या प्रगतीला ७५.४० गुण मिळाले. सामाजिक शास्त्र विषयात ३८ गुण मिळाले, कारण भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी तिचा अपघाती मृत्यू झाला.