बारामती आगाराला
वर्षभरात ३२ कोटींचा फटका
बारामती: कोरोनामुळे अखंड विश्वावरच जीवघेणे संकट ओढवले आहे. मागील वर्षभरापासून या संकटामुळे सर्वच क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणाऱ्या बारामती एसटी आगाराला तोटा सहन करावा लागला आहे. वर्षभरात बारामती आगाराचे ३२ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटीचे चाक तोट्यात रुतल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून सर्वच शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद असल्यामुळे एसटीने प्रवास करणाॉऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा प्रवास थांबला आहे. सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना बारामती आगाराकडून पासचे वितरण करण्यात येते. तसेच विविध कंपन्यांमध्ये व इतर ठिकाणी नोकरी करणाऱ्या प्रवाशांना वितरित करण्यात येत असणारे मासिक, त्रैमासिक पास मध्ये पन्नास टक्के घट झाली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बारामती आगारातून लालपरी रस्त्यावर धावलीच नाही. उन्हाळी हंगामात आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळत असते. मात्र, टाळेबंदीमुळे वाहतूक बंद असल्याने गतवर्षी आगाराला तब्बल ९ कोटी हून अधिक नुकसान झाले. यंदा ही कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी प्रवासाकडे पुन्हा पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंदाचा ही उन्हाळी हंगाम वाया जाण्याची गडद चिन्हे आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला चालक व वाहकांचे पगार तसेच इतर पूरक खर्च सुरूच असल्याने बारामती एसटी आगार आर्थिक अडचणीत सापडले आहे. सध्या बारामती आगाराला प्रतिदिन ६ ते सात ७ रुपये उत्पन्न मिळत असताना खर्च मात्र १० लाख रुपये होत आहे. नोकरी व इतर कामासाठी बारामतीतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे बारामती पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बारामती आगारातून ४६ गाड्या सोडल्या जातात. यामध्ये साधी, निम आराम व शिवशाही गाड्यांचा समावेश आहे. या मार्गावरील गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच नीरा, भिगवण, फलटण, जेजुरी या मार्गावर धावणाºया शटल गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे
--------------
शिवाय कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक प्रवास करणे टाळत असल्यामुळे मार्च २०२० ते मार्च २१ दरम्यान बारामती आगाराचे सुमारे ३२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.
- अमोल गोंजारी
आगारप्रमुख, बारामती आगार
-------------------
कोरोनामुळे तोट्यात असणाऱ्या बारामती आगाराने उत्पन्नवाढी बरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी बारामती आगारातून कोकण दर्शन, अष्टविनायक दर्शन, गाणगापूर दर्शन याठिकाणी जाण्यासाठी डिसेंबरमध्ये गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने या मार्गावरील गाड्या ही लवकरच बंद कराव्या लागल्या.
--------------------------
फोटो ओळी : बारामती बसस्थानकात कोरोना महासाथीमुळे वर्षभरानंतरही शांतता आहे.
२७०३२०२१-बारामती-१०
----------------------