मंचर:
एसटी बस व पिकअप गाडी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघातपुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावचे हद्दीत आज दुपारी झाला. एसटी बस चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर पुणे ते नाशिक एसटी बस क्रमांक एम. एच.14 बी. टी 4079 हिने नारायणगाव बाजूकडून येणारी पिकआप गाडी क्रमांक एम. एच 14. के. ए.0881 या गाडीला विरुद्ध बाजूला जाऊन धडक दिली. एकलहरे पुलाच्या पुढील बाजूस आणि चॉईस मटण शॉपच्या अलीकडे हा अपघात झाला. यामध्ये पिकअप मधील अनिल निवृत्ती आवटी, आनंद निवृत्ती गायकवाड, विजय बाळशीराम जाधव हे तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.
एसटी बसमधील ऋषिका विलास हाडवळे, विलास तुकाराम हडवळे, अजिंक्य परमेश्वर चौरे, बाजीराव लक्ष्मण तिकडे, रूपाली संजय मांजरे, सुरेखा माणिक गोसावी, सुखदेव नामदेव सोनवणे, स्वाती सुभाष शहाणे, मयूर प्रकाश मोरे, संदीप एकनाथ खरात व सचिन मारुती लोंढे हे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत.
राजुरी येथून पुणे या ठिकाणी दूध घेऊन पिकअप गाडी चालली होती. एसटी बस चालकाने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून समोरा समोर पिकअप गाडीला धडक दिली. एसटी बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 11 प्रवाशांना डोक्याला, तोंडाला आणि हाताला किरकोळ जखमा होऊन मुका मार लागला आहे. 24 प्रवाशांना दुखापत झाली नाही. त्यांना दुसऱ्या वाहनातून पुढे पाठवण्यात आले. अपघात झाल्यानंतर बस चालक तेथून फरार झाला आहे.
सदर अपघाताची माहिती रस्त्याने जाणाऱ्या एका गाडी चालकाने मंचर पोलीस ठाण्यात कळवली. घटनास्थळी प्रवासी व एकलहरे येथील स्थानिक नागरिकांनी व अनेक तरुणांनी मदत केली. दोन्ही वाहनांचा अपघात गंभीर असल्यामुळे अपघातग्रस्त वाहने रस्त्यातच बराच वेळ उभी असल्याने पुणे नाशिक महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी अपघातग्रस्तांना नेण्यासाठी अमित काटे आणि स्वर्गीय नाथा बापू पडवळ या रुग्णवाहिका चालकांनी धाव घेत जखमींना ताबडतोब मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणि सिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. एसटी चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश डावखर करत आहे.