पिंपरी : मादक द्रव्याचे सेवन करून चालकांनी एसटी बस चालवली. याप्रकरणी दोन चालकांच्या विराेधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बंगळुरू-मुंबई महामार्गावर वाकड पुलावर रविवारी (दि. १९) पहाटे सव्वातीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
दयानंतर देविदास ढवळे (५६, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नंदकिशोर मारुती तिडम (वय ३९), विलास भाऊरावजी घोडाम (४२, दोघेही रा. चंदगड, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दयानंद ढवळे हे एसटी महामंडळामध्ये वाहतूक नियंत्रक आहेत. तर नंदकिशोर तिडम आणि विलास घोडाम हे एसटी महामंडळाचे बस चालक आहेत. नंदकिशोर आणि विलास हे दोघेही मुंबई ते चंदगड निम आराम बस घेऊन जात होते. ही बस बंगळुरू-मुंबई महामार्गावर वाकड पूल येथे थांबली होती. त्यावेळी बसमधील प्रवाशांना बस चालक नंदकिशोर आणि विलास हे दोघेही कसले तरी मादक द्रव्य सेवन केल्याचे मिळून आले. त्यावरून प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक दयानंद ढवळे यांच्याकडे तक्रार केली.
त्यावरून ढवळे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८५(१) मोटार वाहन कायदा १८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच बस चालक नंदकिशोर आणि विलास यांना सीआरपीसी कलम ४१ (अ)(१) प्रमाणे नोटीस दिली. पोलिस हवालदार हेमंत हांगे तपास करीत आहेत.