पुणे: पुण्याहून भोरमार्गे महाड जाणाऱ्या वरंधा घाटात एका वळणावर एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळ्याने अपघात घडला आहे. एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
बस दरीतील एका झाडाला अडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. महाड तालुक्यातील वरंधा घाटाच्या हद्दीत दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली. सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते. ४ जणांना गंभीर दुखापत झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर वरंधा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताचं स्थानिकांनी आणि या मार्गावर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं आहे.
झाडाला अडल्यानं मोठा अनर्थ टळला
एसटीचा ब्रेक फेल झाल्याने बस थेट दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. परंतु बस दरीतील एका झाडाला अडल्यानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. जखमींवर वरंधा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.