मंचर : पुणे - नाशिक महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. ९) रात्री पावणे नऊ वाजता झाला.
सांगली बोरगाव येथील आठ ते दहा भाविक देहू येथील तुकाराम बीज करून नाशिक त्र्यंबकेश्वर याठिकाणी देवदर्शनासाठी जात होते. एकलहरे येथील किगा आईस्क्रीम दुकानाच्या अलीकडे लघुशंकेसाठी तीन वारकरी थांबले. मंचरच्या दिशेने जात असलेली अहमदनगर तारकपूर एसटीने तीनही वारकऱ्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये वारकरी दिलीप नामदेव सुतार (वय ६०), पांडुरंग जयवंत मंडले (वय ४५), वसंत विष्णू पाटील (वय ५० सर्व रा. बोरगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना गौरव बारणे यांनी रुग्णवाहिकेद्वारे मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस नंदकुमार आढारी यांनी पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी पाठविताना माजी उपसरपंच दीपक डोके, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, देविदास डोके, सुमेश फलके, सुधीर फलके, संतोष गुळवे यांच्यासह एकलहरे येथील तरुणांनी मदत केली. बसने वारकऱ्यांना जबरदस्त धडक दिली. या अपघातावेळी मोठा आवाज झाला.
हा आवाज ऐकून सलूनमध्ये बसलेले तरुण घटनास्थळी धावत आले व त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्याकामी मदत केली. बसचालक वारकऱ्यांना उडवून गाडी घेऊन फरार होणार असताना तरुणांनी बस चालकाला अडविले व गाडी बाजूला घेण्यास भाग पाडले. मंचर पोलिसांनी एसटी बसचालक बाळासाहेब कानवडे (रा. सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर) याला ताब्यात घेतले आहे. अपघाताचा तपास मंचर पोलिस करत आहेत.