बारामती: राज्यात उद्योजकांपाठोपाठ बळीराजाच्या मदतीला 'लालपरी' धावणार आहे. बारामतीमध्ये राज्यातील पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे. या प्रयोगाअंतर्गत येथील कृषि विज्ञान केंद्रातुन ४४ हजार ऊस रोपांची शेताच्या बांधावर 'डिलीव्हरी' करण्यात आली आहे.एसटी महामंडळाच्या पुढाकारामुळे कोरोना लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. सुरक्षित वाहतुकीबरोबरच शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत झाल्याने हा प्रयोग फायद्याचा ठरत आहे.
बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कमधुुन कोरोना लॉकडाऊनच्या काळात कपडे वाहतुक करण्यात आली.तसेच, उद्योगांना देखील वाहतुकीसाठी चांगली मदत झाली.परप्रांतीयांना त्यांच्या मायभुमीमध्ये पोहचविण्यासाठी देखील लाल परी धावली. आता बळीराजाच्या मदतीसाठी लाल परी धावत आहे.कोरोनामुळे अनेक ठिकाणी खासगी वाहतुक बंद आहे.परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. एसटीमधुन शेतीच्या बांधावर रोपे मिळत असल्याने शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे.
बारामती येथील अॅग्रीकल्वरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषि विज्ञान केंद्र आणि बारामती आगार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरु आहे.याबाबत कृषि विज्ञान केंद्राचे फार्म मॅनेजर महेश जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, कोरोनामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडचण होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर रोपे मिळावी,या उद्देशाने एसटी बसमधुन वाहतुक सुरु आहे. आतापर्यंत ४४ हजार रोपांचा भीमाशंकर कारखाना,जुन्नर परिसरात पुरवठा करण्यात आला आहे.यामध्ये एसटीला १ लाखासाठी केवळ २५० रुपये अधिभार दिल्यानंतर नुकसान झाल्यास एसटीच्या वतीने भरपाई देण्याची सोय आहे.राज्यात कोणत्याही ठिकाणी पोहच सुविधादेण्यात येत आहे. खासगीच्या तुलनेने एसटीचा खर्च कमी असुन शेतकऱ्यांची बचत होत आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले,कोरोना लॉकडाऊन काळात या सेवेचा शेतकºयांना फायदा होईल.शेतकऱ्यांनी याचा अवश्य फायदा घ्यावा,असे आवाहन चेअरमन पवार यांनी केले.—————————————