पुणे : राज्य परिवहन महामंडळाला पुणे विभागात बुधवारी (दि. १५) अर्थात भाऊबीजेला एकाच दिवशी तब्बल दीड काेटी रुपयाची कमाई मिळाली. कोरोनानंतर प्रथमच एका दिवशी एवढी वाढ झाली आहे.
एसटी महामंडळाला १० वर्षांतला आर्थिक उच्चांकी आकडा वाढत असून, एसटीची आर्थिक घडी रुळावर येण्यास मदत होत आहे. यंदा दिवाळीत पुणे विभागातून एसटी बसमधून प्रवासाला प्राधान्य दिल्याने भाऊबीजेला तब्बल एक कोटी ५१ हजारांचा महसूल मिळाला. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याने महसूल वाढल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी "अमृत ज्येष्ठ नागरिक योजना" तसेच तिकीट दरात ५० टक्के सवलत देणारी “महिला सन्मान योजना' अशा सवलतींच्या अनेक योजना सुरू केल्याने एसटीला चांगला महसूल मिळाला आहे.
अपुऱ्या बस, मनुष्यबळाची कमतरता, यांत्रिकी विभागात सामग्री आणि सुविधांचा खडखडाट, अशी परिस्थिती असतानाही लालपरी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या काेनाकोपऱ्यात पोहोचत आहे. या अडचणींवर मात करत, यांत्रिक विभागातील कर्मचारी, चालक, वाहक आणि अन्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे महसुलाचा हा पल्ला गाठता आला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारकडून विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे पुणे विभागात भाऊबीजेला एका दिवसात एसटीला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागाच्या १३ आगारातून ८०० गाड्यांमधून १ लाख ६७ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. आगामी काळात नव्या कोऱ्या लालपरी व शिवशाही बस आगाराला मिळतील. - कैलास पाटील, विभागीय निबंधक, एसटी महामंडळ
भाऊबीजेनिमित्त कुटुंबासह पुणे-लातूर एसटीने प्रवास केला. त्यातही ५० टक्के सवलत मिळाल्याने ५०० रुपयांची बचत झाली. - नंदा वाघमारे, प्रवासी